करमाळा (सोलापूर) : नवरात्रोत्सव अगदी एक- दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांनी केली आहे. दसरा आणि दिवाळीत शहर स्वच्छ रहावे म्हणून स्वच्छता करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट बेस वरील कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान नगरपालिकेचे दिगंबर देशमुख म्हणाले, शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. कामगारांचा प्रश्न असला तरी शहरात दुर्गंधी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कचरा उचलण्यासाठी घंटा गाड्या व ट्रॅक्टर सुरु केलेला आहे.

नवरात्रोत्सवापूर्वी आपल्याकडे संपुर्ण घराची स्वच्छता करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सध्या प्रत्येकाच्या घरी साफसफाई करण्याची कामे सुरु आहेत. त्यात घंटा गाडीचा विषय सध्या चर्चेत आहे. त्यामुळे कचरा उचलण्यावर परिणाम झाला आहे. वेळेत कचरा न उचलल्याने दुर्गंधी पसरत आहे. यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दसरा व दिवाळी जवळ येत आहे. त्यापूर्वी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ. घोलप म्हणाले, दसरा व दिवाळी जवळ आली आहे. त्यात कचरा साचून दुर्गंधी झाली तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यात पाऊस झाला तर नागरिक आजारी पडतील. त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून त्वरित काळजी घेण्यात यावी.
