मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (ता. ९) झाला. यामध्ये आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही त्यांनी राष्ट्रवादीवर अनेकदा जाहीरपणे टीका केली होती. शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले तेव्हा सावंत हे त्यांच्याबरोबर होते. सुरत व गुवाहाटी येथेही ते बरोबर होते.

सावंत हे माढा तालुक्यातील असले तरी त्यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणावर पकड आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मात्र शिवसेनेतील बंडावेळी त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती. शिवसेना व भाजप युतीच्या सरकारमध्ये सावंत हे मंत्री होते. आता शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

सावंत यांचा करमाळा तालुक्याच्या राजकारमध्येही हस्तक्षेप होताना अनेकदा दिसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बागल यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तेच आग्रही होते. त्यांच्याच माध्यमातून बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना शिवसेनेकडून उमेदवारही मिळाली होती. त्यामुळेमाजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कट झाली होती.

शिंदे यांनी बंड केल्यानंतर माजी आमदार पाटील यांनी त्यांना पाठींबा दिला होता. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रोकडे जाऊ नये यामध्येही त्यांची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. आता सावंत यांच्याकडे कोणते मंत्रिपद मिळणार आणि त्याचा करमाळा तालुक्याला किती फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

