करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांच्यासह पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे व करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी घोटी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत डोल- ताशाच्या गजरात लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर व उपपोलिस निरीक्षक साने यांनीही ताल धरला होता तर शेटफळ येथे पोलिस उपनिरीक्षक सचिन जगताप यांनीही लेझीम खेळण्याचा आनंद घेतला.
कोरोनामुळे सलग दोन वर्ष गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या नव्हत्या. यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने गणेश भक्तांमध्ये उत्सहाचे वातावरण होते. गणेश चतुर्थीपासून १० दिवस गणेश मंडळांकडून श्री गणेशापुढे विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर विसर्जन मिरवणुका यावर्षी धुमधडाक्यात निघाल्या होत्या. अनेक शेटफळ, घोटी, कंदर, पोथरे आदी ठिकाणी पारंपरिक वाद्याच्या तालात मिरवणुका निघाल्या होत्या.

मिरवणुकांमध्ये गणेशभक्त ज्याप्रमाणे उत्साह साजरा करत होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील अधिकारी यांनीही मिरवणुकीत सहभाग घेऊन जल्लोष साजरा केला. पुणे, कोल्हापूर येथे पोलिसांनी मिरवणुकीत जल्लोष केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसाच करमाळा तालुक्यातील अधिकाऱ्यांनीही मिरवणुकीत एकत्र येत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला आहे.

शेटफळ येथील नागनाथ गणेश मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत नागनाथ लेझीम संघाचा लेझीम सुरू असताना बंदोबस्ताची पहाणी करण्यासाठी आलेल्या साह्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांना लेझीम खेळण्याचा मोह झाला. गावातील संघात २०० पेक्षा ज्यास्त तरूणांचा सहभाग असतो. या तरूणांनी पारंपरिक लेझीम खेळाचे परंपरा जोपासल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेत विसर्जन मिरवणूक शांततेत व वेळेत संपवली.
