करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तरटगाव येथील कै. ऍड. नानासाहेब विनायकराव घाडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (ता. ८) महंत शांतिगिरीराज महाराज किर्तेश्वर संस्थान चिंचपूर (ढगे) यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्यासह घाडगे परिवाराने केले आहे. या निमित्ताने डॉ. स्वाती अमोल घाडगे यांनी मांडलेल्या आठवणी…
आबा रुग्णालयामध्ये असताना मला फोन आला. तुम्ही मुले कसे आहात? सर्वांची खुशाली कळवताच आबांना झालेला आनंद त्यांच्या आवाजावरून लक्षात येत होता. आबांच्या बोलण्यात कधीच कुठल्या गोष्टीचा खेद, नैराश्य आणि दुःख नसायचे. तसाच तोही आवाज होता नेहमीचा सकारात्मक… मनात कुठेही शंकेची पाल चुकचुकली नाही… नेहमी हसतमुख, प्रचंड अदब, शांत, स्थितप्रज्ञ, आनंदी, पांडुरंग भक्त आबांना घेऊन जाताना काळालाही दोन मिनिटे विचार नक्कीच करावा लागला असणार की आपण बरोबर माणूस नेतोय ना… जसा रुक्मिणीचा कौस्तुभमणी नेताना तो दोन मिनिटे थबकला होता.
आबा करमाळ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ! तालुका आणि परिसरातील सामान्य जनमाणूस आणि न्यायव्यवस्था यातील विश्वासू आणि महत्त्वपुर्ण असा दुवा आणि सल्लागार… सामाजिक जीवनात प्रचंड उंची गाठलेली पण कौटुंबिक जीवनात तितक्याच सहजतेने मिसळणारे, न्यायालयातून आल्यावर दारात काढलेले शूज आणि अडकवलेला कोट एवढेच काय ते आबांचे वकील असल्याचे जाण करून देणारे! घरात आले की नातवंडांमध्ये पूर्ण रममाण होणारे आबा… लहानपणीच पितृछाया हरवलेली मी १० वर्षांपूर्वी माप ओलांडून या घरात आले आणि आबांसारखे वडील मला सासर्यांच्या रूपात लाभले. देवाची सुंदर भेट मला मिळाली. घाडगे वकिलांच्या सूनबाई म्हणून अभिमानाने मिरवायची मी आणि घरातही तितक्याच सहजतेने लेकी सारखी वावरत हसत खेळत होते. न बोलता, न मागता लेकी प्रमाणे माझी सर्व हौस पूर्ण केली आबांनी. न्यायालयाच्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला तरी आबा कधीही रिकाम्या हाती परत आले नाहीत.
घरातील वातावरण कायम आनंदी असाव असे नेहमी आबांना वाटे. त्यासाठी ते स्वतः ही कटाक्षाने लक्ष घालत. नातवंडांच्या जन्मानंतर कर्तव्यपूर्ती झाल्यासारखा आनंद ओसंडून वाहायचा आबांच्या चेहऱ्यावरून. राऊ- कुहू सोबत खेळताना, गप्पा गोष्टी करताना, नवनवीन गोष्टी त्यांना शिकवताना आबा लहान होऊन जायचे. आबांचे एकेक कलागुण बाहेर पडायचे. आबांना लेझीम, पखवाज, पेटी (हार्मोनियम) वाजवणे हे उत्तम रित्या जमायचे हे आम्हाला राऊ खेळकर झाल्यानंतर समजले.
कोरोना लॉकडाऊनमध्ये मुलांना कॅरम आणि बुद्धिबळ शिकवतानाचा आबांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आजही कॅरम आणि बुद्धिबळ बघितले की मुले आजोबांना गृहीत धरतात. आजोबा म्हणून मुलांचे लाड पुरवत असतानाच वडील म्हणून डॉक्टरांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय हालचालींवर ही त्यांचे बारीक लक्ष असायचे. आपल्या वकिली शैलीमध्ये ते माझ्याकडून गोष्टींची खात्री करून घेत आणि मला याची मनोमन खूप मजा वाटे.
समोरच्याला लवकर लक्षात येणार नाही असे मार्मिक, मिश्किल बोलण्यात आबांचा हातखंडा होता. बोलणाऱ्याचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यायचे, प्रतिक्रिया देण्याची घाई करायची नाही ही आबांची नेहमीची शिकवण. आबांना त्या भूमिकेत मी अनेकदा पाहिले तेव्हा वाटायचे हलाहल पचविण्याची शक्ती शंकरा पाठोपाठ फक्त आबांकडेच आहे.
व्यावसायिक आणि प्रापंचिक निर्णयस्वातंत्र्य देतानाही नाण्याच्या दोन्ही बाजूंची मांडणी ते आमच्या समोर अगदी चपखलपणे करत. वागण्या- बोलण्यात जेवढा साधेपणा तेवढाच तो खाण्याच्या बाबतीतही होता. समोर असेल ते शाकाहारी रसिकतेने सेवन हे आबांचे वैशिष्ट्य. मग ते साधी चटणी- भाकरी का असेना.. हुरड्याचे दिवस तर आबांसाठी पर्वणी!
स्वतःच्या मोठेपणापेक्षाही लेक- जावई, मुलगा- सून, कर्तबगार आप्त- नातेवाईक यांचा विशेष अभिमान बोलण्यातून सतत ओसंडून वाहायचा. आई- आबांची चेष्टा- मस्करी आणि प्रेम घराला स्वर्गाची शोभा आणत होते. कुटुंबात भांडण तंटे, वाद- विवाद, समाजात संघर्ष या गोष्टी आबांना कधीच आवडल्या नाहीत. सर्वांनी एक विचाराने राहावे यासाठी ते स्वतः कायम प्रयत्नशील असायचे.
आबा म्हणजे स्थितप्रज्ञतेचा महामेरू, आयुष्यातल्या सर्वच प्रसंगांना एकाच शांत स्थिर भावाने ते सामोरे जायचे. कधी न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागला म्हणून अति आनंदी भाव नाही की कधी मनाविरुद्ध घटना घडल्या म्हणून त्रासिक भाव नाही. चेहऱ्यावरील भाव कायम शांतच. अशी स्थितप्रज्ञाची साकार मूर्ती मी प्रथमच अनुभवली.
हॉस्पिटलला जाताना आईंना रडू आवरेना, तर जाताना आबा मला म्हणाले, ‘मला रडलेले आवडत नाही यांना सांगा रडायचे नाही’ हा पुढच्या अशुभ घटनेचा संकेत तेव्हा लक्षात आला नाही. दिवसेंदिवस हॉस्पिटलमध्ये परिस्थिती ढासळत असताना आबांनी उभारलेले वैभव नकोसे वाटायला लागले. मला काही नको फक्त आबा पाहिजेत’ हे डॉक्टरांचे गाऱ्हाणे खंडेरायाने ऐकायला हवे होते. खरा खुरा ‘श्रावण बाळ’ जहांगीरच्या आवारात तळमळत होता. आम्हाला बुद्धिबळाच्या अजून खूप चाली आबांकडून शिकायच्या होत्या. पण एकच भेदक चाल चक्रव्यूह फोडून आली आणि आमचा ‘वजीर’घेऊन गेली. सगळे सोहळे रुबाबात करणारे हे स्थितप्रज्ञ योगी स्वतः मात्र आपले दर्शनही न देता रुक्मिणी मातेच्या मांडीवर चिरनिद्रा घेता झाले. जन्मभर वारकरी असलेले आबा, एकही एकादशी न चुकवलेले आबा, यमदूत दारात असतानाही आम्ही सगळ्यांनी ‘औषध म्हणून तरी’ अंडी खाण्याची गळ घातली तरीही तितक्याच रुबाबात मी ‘व्हेज’ आहे हे हॉस्पिटल स्टाफला सांगणारे आबा, “पांडुरंगाचा कृपाप्रसाद ” पांडुरंगाने घाडगे कुटुंबातून काढून घेतला… पित्याची आजन्म सेवा करण्याचे ‘पुंडलिका’चे स्वप्न स्वप्नच राहिले.
आबांच्या जाण्यानंतर लोकांमध्ये- समाजामध्ये मिसळताना, रोजच्या व्यवसायात रुग्ण बनून आलेल्या आबांच्या पक्षकारांच्या गहिवरलेल्या भावना समजून घेताना आबांचे व्यापकत्व अजूनच समजू लागले, त्यांची महानता जाणवू लागली आणि आपली पूर्व संचित आणि पूर्व पुण्याई म्हणूनच आपण त्यांचा मुलगा आणि सून झालो ही गोष्ट आम्हा उभयतांना अधोरेखित होत गेली. या लाटेमध्ये आबांसारखा वटवृक्ष उन्मळून पडला पण आबांच्या संस्कारांच्या, विचारांच्या, शिकवणीच्या, भावनांच्या पारंब्या एवढ्या खोलवर रुजल्या आहेत की त्या पारंब्या पूर्ण ताकतीनिशी खोल भूगर्भातून परत नव् चैतन्याने नवीन वटवृक्षाची नांदी नक्कीच ठरतील. सदैव चरणी नतमस्तक!
- डॉ. स्वाती अमोल घाडगे