सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंगळवारी (ता. ९) मंत्री मंडळ विस्तार झाला. त्यात भाजपच्या ९ व शिंदे समर्थक ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता सोलापूरचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने भाजपकडे पालकमंत्री पद जाऊ शकते अशीही चर्चा आहे.
सोलापूरचे पालकमंत्रीपद प्रा. तानाजी सावंत यांच्याकडेच राहणार!

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथील सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूर- मंगळवेढा येथील समाधान अवताडे, माळशिरस येथील राम सातपुते, सोलापूर दक्षिणचे सुभाष देशमुख, सोलापूर उत्तरचे विजयकुमार देशमुख हे आमदार आहेत. तर बार्शीचे राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत. त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री पद हे भाजपच्याच मंत्र्याकडे जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित व मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यापैकी एकाला सोलापूरच्या पालकमंत्रीपदी संधी दिली जाऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

