करमाळा (सोलापूर) : घोटीतील नागरिकांनी सुरु केलेल्या अमरण उपोषणावर दुसऱ्यादिवशी तोडगा निघाला आहे. हे उपोषण मागे घ्यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता के. एम. उबाळे यांच्या केबिनमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. काम झाल्याशीवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगत शेतकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र तहसीलदार समीर माने यांच्यासमोर उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळाने विषय मांडला. त्यानंतर तहसीलदार माने यांनी तत्काळ बैठक बोलावली. त्यात पोलिस संरक्षण घेऊन उपोषणकर्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले आहे.
तालुक्यातील घोटी ते वरकुटे रस्त्याच्या बाजूने जाणारे पाणी काही शेतकऱ्यांनी अडवले आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे. याचे निवेदन त्यांनी तहसीलदार समीर माने व पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना दिले.

घोटी ते वरकुटे रस्त्याच्या बाजूला घोटी हद्दीतील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, रस्त्याच्या बाजूने असलेल्या चारीतून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जातो. मात्र हे पाणी जाणारी चारी शेतकऱ्यांनी आडवली आहे. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हनुमंत राऊत, युवराज जाधव, विठ्ठल जाधव, अमोल जाधव, विठ्ठल जाधव व प्रकाश जाधव यांनी सोमवारपासून (काल) उपोषण सुरु केले होते.

मंगळवारी या उपोषणाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयातील उबाळे यांच्या समोर चर्चा झाली. तेव्हा उबाळे यांनी प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावर उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही. चर्चा झाली तेव्हा ऍड. अमर शिंगाडे, राष्ट्रवादीचे हनुमंत मांडरे पाटील, श्री. लावंड आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी तहसीलदार माने यांच्याकडे त्यांचे म्हणणे मांडले.
