करमाळा (अशोक मुरूमकर) : भीमा नदीवर उजनी धरण झाले तेव्हापासून या भागातील नागरिक समस्यांचा सामना करत आहेत. या भागात शेती हिरवीगार झाल्याने आर्थिक प्रगती झाली मात्र मूलभूत सुविधांपासून हा भाग वंचित आहे. करमाळा तालुक्यातील कुगावसह परिसरातील गावांपासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर हाकेच्या अंतरावर आहे. परंतु येथे जाण्यासाठी ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हा वळसा टाळण्यासाठी नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. त्यातच काल (मंगळवारी) झालेल्या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर त्यात दळणवळचे माध्यम महत्वाचे आहे. उजनी बॅक्वॉटर भागात दळणवळणासाठी पुलाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. हा पूल नसल्याने येथील नागरिक बोटीने जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यातूनच काल वादळी वाऱ्याने एक प्रवासी बोट उलटली. त्यात सहाजण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.
उजनी धरण परिसरात भीमा नदीतून करमाळा व इंदापूर तालुक्यात ये- जा करण्यासाठी या ठिकाणी आहेत बोटी
- केत्तूर ते चांडगाव
- ढोकरी ते शहा
- चिखलठाण ते पडसथळ
- कुगाव ते सिरसोडी
- कुगाव ते कळशी
- कुगाव ते कालठाण
- वाशिंबे ते गंगावळण
इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडण्यासाठी पूल महत्वाचा आहे. हा पूल नसल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास केला नाही तर ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यात वेळ जातो आणि पैसाही खर्च होतो आहे. शिवाय शेतमालाची विक्री करण्यासाठीही वाहतूक लांबची पडते. यामुळेही नुकसान होत आहे. जीवघेणे प्रवासात जीवही जात असल्याचे समोर येऊ लागले आहे.
ऑईल पाण्यावर आल्याने वाऱ्याने उलटलेली बोट सापडली! २४ तासानंतरही उजनीत बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध सुरूच