करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी संचालक मंडळाची बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या निवासस्थानी आज (शनिवारी) बैठक झाली आहे. कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे व संचालिका रश्मी बागल यावेळी उपस्थित होते. या बैठकीत संचालकांना कारखान्याबाबत सुरु असलेल्या सर्व प्रकरणांची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तरे देण्यात आली आहेत.
करमाळा येथील आदिनाथ कारखान्याचे न्यायालयीन प्रकरण सुरु असताना यावर्षी कारखाना सुरु होणार की नाही अशी चर्चा आहे. त्यातच संचालक मंडळाने बैठक घेऊन कारखाना सुरु करण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखाना कसा सुरु करायचा याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे.
आदिनाथ कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आदिनाथ सुरु झाला तर शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न सुटणार आहे, अशी भावना शेतकऱ्यांची आहे. आदिनाथबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे संचालक मंडळांनी कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हा कारखाना संचालक मंडळ कसा सुरु करणार व कधी काम सुरु केले जाणार याबाबचे तपशील समजू शकले नाहीत. मात्र यावर्षी कारखाना सुरु करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न सुरु केला आहे. त्याला कसे यश मिळणार हे पहावे लागणार आहे.