करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी बुधवारी (ता. १७) साडेपाच कोटी रुपये भरण्यात आले आहेत, अशी विश्वासनीय सुत्राकडून माहिती समजली आहे. आदिनाथसाठी सध्या न्यायालयात प्रकरण सुरु आहे. सोमवारी (ता. २२) मुंबईतील ‘डीआरएटी’ न्यायालयात सुणावणी होणार आहे. त्यापूर्वीच एमएससी बँकेत साडेपाच कोटी रुपये भरले असल्याचे समजत आहे.

आदिनाथसाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक कोटी भरले होते. त्यानंतर आता संचालक मंडळाच्या विनंतीवरुन जयवंत मल्टीस्टेटने पैसे भरले आहेत, अशी माहिती विश्वासनीय सूत्राकडून समजले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रीया पूर्ण झाली नाही. त्यानंतर याबाबत न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पुणे येथील ‘डीआरटी’ न्यायालयाने कारखान्याचा ताबा ‘एमएससी’ला (महाराष्ट्र सहकारी बँक) देण्याबाबत संचालक मंडळाला आदेश दिला होता. त्यानंतर बँक बारामती अॅग्रोला कारखाना देणार होती.

मात्र या आदेशाला मुंबईत आव्हान देण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले होते. दरम्यान संचालक मंडळाला दिलासा मिळाला होता. पुढील तारीख 22 अॉगस्ट देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच आता पैसे भरण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे 22 तारखेला काय होणार हे पहावे लागणार आहे.