करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तीन वर्षांपासून बंद असलेल्या श्री आदीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामाचा श्री गणेशा आज (रविवारी) कारखान्यावर अभिषेक करुन करण्यात आला. माजी आमदार नारायण पाटील यावेळी उपस्थित होते. हरीदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, देवानंद बागल, दत्तात्रय जाधव, प्राचार्य जयप्रकाश बीले आदी उपस्थित आहेत.
आदीनाथ कारखान्यावर राजकारण करु नये असे आवाहन करत मंत्री तानाजी सावंत यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

आरोग्य मंत्री प्रा. सावंत यांनी आदिनाथ कारखान्याच्या खात्यावर अनामत रक्कम म्हणून नऊ कोटी रुपये भरत आदिनाथ साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. रविवारी या हंगामाच्या तयारीच्या कामाचा शुभारंभ होत आहे. आदिनाथ साखर कारखाना भाड्याने देण्याची प्रक्रिया तीन वर्षांपूर्वी राज्य सहकारी बँकेने केली होती. या प्रक्रियेत आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने सहभाग घेऊन त्यांना हा कारखाना मिळाला होता. मात्र निविदा प्रक्रिया झाल्यानंतर हा कारखाना किमान 25 वर्षे भाडे कराराने आम्हाला द्या, असा प्रस्ताव बारामती ॲग्रोने बँकेकडे दिला होता. नियमानुसार हा कारखाना 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी देता येत नव्हता. त्यातच या कारखान्यावर एनसीडीसी बँकेचे 40 कोटी कर्ज आहे, ते आम्हाला बँकेने सांगितले नाही, असे सांगत बारामती ॲग्रोने दोन वर्षात करार केला नाही.

त्यानंतर माजी आमदार नारायण पाटील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, शिवसेना जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी मंत्री सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यानुसार पैसे भरल्यानंतर आता आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. (कार्यक्रम अजून सुरु आहे. यामध्ये बदल होऊ शकतो.)
