करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जातेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहारातील डाळीमध्ये वाळू आढळून आली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना संबंधित डाळीचे नमुने देण्यात आले असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेनी चौकशीची मागणी केली आहे.

स्वतःच्या लोभासाठी डाळीचे वजन वाढवे म्हणून लहान मुलांच्या आरोग्याशी हा खेळ सुरु आहे. तो असाच सुरु राहीला व विद्यार्थ्यांना यातुन काय झाले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

संपूर्ण तालुक्यातील शाळेमध्ये हाच प्रकार असल्याचे सांगत या सर्व प्रकाराची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनी केली आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा उपाध्यक्ष भाऊ झोळ, जिल्हा कार्यउपाध्यक्ष दीपक शिंदे, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, शाखाध्यक्ष (जातेगाव) अशोक लवंगारे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे देखील हा प्रकार समजताच निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. असा प्रकार करणार्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.