करमाळा (सोलापूर) : नगर- करमाळा राज्य महामार्गावर कुकडीचे पाणी मिळावे या मागणीसाठी मांगी येथे दिग्वीजय बागल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 17) सकाळी 11 वाजताच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन झाले. यावेळी दिग्वीज बागल यांच्यासह सुमारे 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, मांगीचे सरपंच आदेश बागल, दिनेश भांडवलकर, पोथरेचे हरिश्यचंद्र झिंजाडे, प्रकाश पाटील आदींचा सामावेश आहे.
कुकडीचे पाणी मांगी तलावात मिळावे यासाठी बागल यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन झाले. यावेळी वरीष्ठ आधिकारी उपस्थित नसल्याने बागल यांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत आधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
दरम्यान पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन व्हानच्या माध्यमातुन ताब्यात घेऊन करमाळा येथील पोलिस ठाण्यातील क्षितीज हॉलमध्ये आणून ठेवण्यात आले.