पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडील पद काढा; शिवसेनेची मागणी, कोरोना लढ्यात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

The Political story of Solapur district NCP and Shivsena

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष असून कोरोनाचे संकट वाढत असताना त्यांचा शासकीय अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांशी संपर्क नाही. त्यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून सक्षम मंत्र्याकडे द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. औषधे, ऑक्सीजन मिळत नसल्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जागा मिळत नाही. . त्यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. यासंदर्भात पालकमंत्री भरणे यांनी एकही बैठक घेतली नाही, असे चिवटे यांनी म्हटले आहे.
करमाळा तालुक्यात फक्त ३५ बेड उपलब्ध असून या ठिकाणी सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेला नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क केला असता औषधांची मागणी केली असता पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नाही.
रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नेमलेल्या कमिटीचे सदस्य फोन उचलत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनावर दत्ता मामा भरणे यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे सत्तेचे पांघरून घेतलेले पालकमंत्री कर्तव्याला विसरत आहेत. कोणत्या तालुक्याला किती औषध दिली याची माहिती प्रसिद्ध केली जात नाही.

अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. करमाळा तालुक्यात गेली चार दिवसापासून 40 ते 50 रुग्णांना औषधाची गरज आहे. वारंवार तालुका वैद्यकीय अधिकारी संबंधित आपात्कालीन व्यवस्थेला संपर्क साधला असता एकमेकांकडे बोटे दाखवली जाता.
अशा परिस्थितीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना करणे गरजेचे होते. राष्ट्रवादी वाढवण्याच्या कामासाठी ते फिरत आहेत. मात्र कोरोनाच्या लढाईत ते उतरत नाहीत, अशी त्यांच्यावर टिका केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *