करमाळा तालुक्याचे राजकारण म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’!

-

करमाळा तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली. सुरुवातील यातील काही ग्रामपंचायतीमध्ये तालुका पातळीवरचे राजकारण बाजूला ठेऊन सर्व गटाच्या कार्यकर्त्यांही सोईनुसार भूमिका घेऊन निवडणूक रिंगणात उतरले. निवडणूक निकालानंतर मात्र पुन्हा आपापल्या भूमिका घेऊन कार्यकर्ते कामाला लागले. यात नेत्याच्या समाधानासाठी व गावातील वजन दाखवण्यासाठी तेच कार्यकर्ते सर्व गटाकडे गेल्याचे दिसले. त्यामुळे कदाचित नेत्यांनाही अंदाज आला नसेल आपले नेमके किती सदस्य विजयी झाले. त्यामुळे दावे- प्रतिदावे करण्यात आले.

करमाळा तालुक्यातील आवाटी, बिटरगाव, सातोली, वदशिवने, वांगी १, वांगी २, वांगी ३ व वांगी ४- भिवरवाडी या आठ ग्रामपंचायतींमध्ये ५९ जागांसाठी निवडणूक झाली. याचा निकाल आल्यावर मात्र बागल, पाटील व शिंदे गटाने आकडेवारी जाहीर करत किती जागा आल्या याचे स्पष्टीकरण दिले. त्यात शिंदे गटाने ३० जागांवर दावा केला. पाटील गटाने ३१ जागांवर दावा केला. बागल गटाने एक चार्ट पाठवून कोणत्या गावात कशी लढत झाली हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ५९ जागांसाठी झालेल्या लढतीत सर्वांचेच दावे वेगळे आहेत.

त्याचे कारण प्रत्येक गटातील कार्यकर्त्यांनी गावात सोईनुसार भूमिका घेतल्या. त्यानंतर विजयाचा गुलाल अंगावर घेऊन सत्कार करण्यासाठी तेच कार्यकर्ते गटाच्या प्रमुख नेत्यांकडे गेले असे झाले असावे. कारण जागांचा दावा करताना आमच्याकडे ‘हे’ कार्यकर्ते आले होते. म्हणून आमचा दावा असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आवाटी येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाविरुद्ध जगताप, पाटील व बागल गट एकत्र होते. बिटरगाव येथे बागल व पाटील एकत्र होते. वांगी नं. १ येथे शिंदे व जगताप गटाविरुद्ध बागल व पाटील गट एकत्र होते. वांगी २ येथे पाटील गटाविरुद्ध शिंदे व बागल एकत्र होते. वांगी ३ मध्येही अशीच स्थिती होती. भिवरवाडीत बागल विरुद्ध शिंदे असा सामना होता. वदशिवने येथे जगताप विरुद्ध बागल अशी लढत होती. सातोली येथे मोहिते पाटील समर्थक साळुंखे विरुद्ध इतर गट होते, असे सांगितले जात आहे.

निवडणुका झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडे जात आहेत. स्थनिक राजकारणासाठी तालुका पातळीवरील राजकारण विसरून कार्यकर्ते एकत्र आले. आता पुन्हा आपल्या नेत्यांकडे जाताना दिसत आहेत. याचा वरच्या राजकाणावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *