मंत्री सावंत यांचे ‘आदिनाथ’बाबत शिष्टमंडळाला मोठं अश्वासन

करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर करमाळा येथील शिंदे समर्थक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे येथे भेट घेऊन सत्कार केला आहे. या सत्कारावेळी तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, प्रा. शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत, शहरप्रमुख संजय शीलवंत, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तालुकाप्रमुख दीपक पाटणे, ऍड. स्वप्निल अवधूत, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, आजिनाथ इरकर यांच्यासह आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून रिटेवाडी उपसा सिंचन योजना, सरफडोह येथील जमिनीचा प्रश्न, मांगी तलावात कायमस्वरूपी कुकडीचे पाणी आणणे या महत्त्वाच्या प्रश्न सोडवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांची मांडणी करून निवेदन दिले.

तालुक्यातील रखडलेल्या योजनेची माहिती घेऊन लवकरच मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्यात येणार असून या सर्व कामातील अडथळा तात्काळ दूर करू, असा विश्वास मंत्री सावंत यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *