करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सागर चित्रमंदिर अखेर जमीदोस्त झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे सिनेमागृह बंद होते. सागर चित्रमंदिर हे करमाळ्यातील एकमेव सिनेमागृह होते. सिनेमागृह बंद पडल्यापासून करमाळ्यातील प्रेक्षक जामखेड, अकलूज व बारामती येथे जाऊन सिनेमा पहाण्याचा आंनद घेत होते. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या वळणावर नेहणारे दिगदर्शक नागराज मंजुळे यांनी या सिनेमागृहात सुरुवातीला सिनेमे पहिले. त्यानंतर त्यांच्या एका चित्रपटाचा प्रीमियम शो देखील या सिनेमागृहात झाला.

करमाळा तालुक्यात सागर चित्रमंदिर हे एकमेव सिनेमागृह सुरु होते. मात्र काही दिवसांपासून ते बंद अवस्थेत होते. सिनेमागृह नसल्याने करमाळ्यातील नागरिकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमा पहाता येत नाही. मोबाईलमुळे कोणताही सिनेमा कधीही पहाता येत असला तरी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा आंनद वेगळाच असतो. हे सिनेमागृह बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये निराशा होती. त्यातच आता हे चित्रपटगृह पाडण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने सिनेमागृह होणार का? याची उत्सुकता लागली आहे.

नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सागर सिनेमागृहाचे मालक दोशी म्हणाले होते. मोबाईलवर चित्रपट पहाण्याचे प्रमाण वाढले. सागर सिनेमागृहाची क्षमता साधारण ३०० प्रेक्षकांची क्षमता होती. मात्र तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने तोटा सहन करावा लागत होता. पुणे- मुंबईबरोबर करमाळ्यात सिनेमा लागत होता. मात्र प्रतिसाद मिळाला नाही तर त्याचा तोटा सहन करावा लागत होता. नागराज मंजुळे यांनी ‘नाळ’ चित्रपटावेळी सागर सिनेमागृहाचा उल्लेख केला होता.
