करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. माढा तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, कर्जत तालुक्यातील अंबालिका, बारामती ऍग्रो, दौंड शुगर यांनी शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
सुपनवर म्हणाले, करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना ६५० रुपये देणे आवश्यक आहे. दसऱ्यापर्यंत दुसरा हप्ता जमा करावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे सुपनवर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष कैलास पवार, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भिमराव येडे, तालुका उपाध्यक्ष अनिल तेली, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर, आजिनाथ इरकर, निलेश पडवळे, हनुमंत राऊत, बाळासाहेब माने, प्रकाश काळे, करमाळा तालुका युवा अध्यक्ष गणेश इवरे, नवनाथ कोळेकर उपस्थित होते.

