करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तीन वर्षांपासून बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मेन्टन्सचे काम सुरु करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ३) माजी आमदार नारायण पाटील, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, प्राचार्य जयप्रकाश बिले, राजाभाऊ कदम, डॉ. वसंतराव पुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, संचालक रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना यावर्षी बंद राहिला तर उसाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. मात्र आता कारखाना सुरु होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आदिनाथ कारखानचे न्यायालयात प्रकरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारवाई करत कारखान्याचा कर्ज वसुलीसाठी लिलाव केला होता. त्यात आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला हा कारखाना गेला होता. मात्र कर्ज परतफेड योजनेत सहभाग घेत त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर बारामती ऍग्रोनेही न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे.

कारखान्याचा ताबा घेतेवेळीच माजी आमदार पाटील यांनी १ कोटी रुपये बँकेचे खात्यात भरले. त्यानंतर मंत्री सावंत यांच्या माध्यमातून बँकेने ठरवून दिलेली रक्कम संचालक मंडळांनी भरली. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. दरम्यान २८ ऑगस्टला कारखान्यावर अभिषेक करण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली आहे, १ तारखेलाच काम सुरु केले होत, अशी माहिती डांगे व बिले यांनी दिली आहे. या हंगामात कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मंत्री सावंत यांच्या सूचनेनुसार बागल व पाटील गटाचे संचालक आदिनाथ कारखान्यासाठी एकत्र काम करणार आहेत.
