करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना येथे चोरी झालेल्या बैलगाडीच्या लोखंडी ऍक्सलचा शोध लावण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. ३ लाख १२ हजाराच्या ५२ लोखंडी बैलगाडी चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणात करमाळा पोलिसात १४ तारखेला गुन्हा दाखल झाला होता. यातील संशयित पकडले असून त्यांच्याकडून इंदापूर येथून बैलगाडीसह एक चारचाकी छोटा हत्ती जप्त केला आहे. संशयित आरोपींकडून ४ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात चार संशयित आरोपी असून त्यातील तिघांना अटक करण्यात अली असून एकजण फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

गणेश केशव दिवसे (वय १९), सागर लाला लवटे (वय २२), नितीन मारुती आरडे (वय ३८) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. राज वसंत साबळे हा संशयित फरार आहे. चारही संशयित आरोपी हिंगणगाव (ता. इंदापूर) येथील आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस नाईक व्यवहारे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी, अमोल जगताप, सोमनाथ जगताप, आकाश भोजणे यांनी तपास केला.

