करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकपदावरून सूर्यकांत कोकणे यांची बदली झाली आहे. याबाबत आदेश आला असून मंगळवेढा पोलिस ठाण्यातून ज्योतीराम गुंजवटे हे आज (शनिवारी) करमाळा पोलिस ठाण्याचा चार्ज घेत आहेत. एप्रिल २०२१ मध्ये कोकणे यांनी करमाळ्याचा चार्ज घेतला होता. कोरोना कालवधीतच ते आले होते. कायदा सुव्यवस्था आबाधित रहावी म्हणून त्यांनी प्रयत्न केलाचशिवाय त्यांची काही कारणांमुळे कारकीर्दही गाजली.
कोकणे हे करमाळ्यात आले तेव्हा कोरोनाचा लॉकडाऊन होता. अनेक निर्बंध असल्यामुळे हॉटेल, दुकाने बंद असायची. त्यात मालवाहतूक ट्र्क चालकांची गैरसोय होत होती म्हणून त्यांनी या ट्र्क चालकांना फळे देण्याचा उपक्रम राबवला होता. त्यानंतर करमाळा शहरात वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून त्यांनी ‘P1, P2, P3’ चा प्रयोग केला. त्यानंतर जातेगाव ते टेंभुर्णी मार्गावर चोरीचे प्रकार घडू नयेत म्हणून अनेक महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे काम केले. यासाठी काही हॉटेल चालकांना सूचना दिल्या. याशिवाय काही ठिकाणी पोलिस मदत केंद्र सुरु केले.

करमाळ्यात बँका, सोने व्यापारी यांच्याशीही बैठक घेऊन दक्षता घेण्याची सूचना देऊन ‘आम्ही तुमच्याबरोबर आहोत’ असा विश्वास दिला. अनके किरकोळ प्रकरणात दोन्ही गटाची समजूत काडून गुन्हे दाखल होण्यापूर्वीच मिटवण्यावर भर दिला. त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीचे समाधान कसे होईल, यावर भर देत पोलिसांवरील विश्वास वाढावा म्हणून प्रयत्न केले. ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्याशी समन्व्य ठेऊन दारू बंदीसाठी काम केले. बालविवाह, वृक्षारोपण यासह सामाजिक सलोखा रहावा म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे.

कोकणे यांनी राजकीय वाद निर्माण होत असतानाही प्रसंगावधानतेने काही निर्णय घेऊन शांतता ठेवण्याचे काम केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व बागल गट यांच्यात झालेल्या संघर्षवेळी कोकणे यांनी केलेलं काम करमाळकरांच्या स्मरणात राहील. रविकांत तुपकर यांनी करमाळ्यात मोर्चा काढला होता. त्याला उत्तर देण्यासाठी बागल गटानेही मोर्चा काढला होता. दोन्ही कार्यकर्ते आमने- सामने आले तर गोंधळ होऊ शकतो अशी शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच त्यांनी खबरदारी घेऊन दोन्ही गटाला समज दिली आणि आंदोलन शांततेत झाले होते.

गुन्ह्यांच्या तपासातही कोकणे यांनी चांगले काम केले असल्याचे सांगितले जाते. याशिवाय शेवटी म्हणजे ऑगस्टमध्ये (याच महिन्यात) राष्ट्रवादीचे संतोष वारे, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचे रस्ता वेगवेगळ्या दिवशी आंदोलन झाले होते. तेव्हा बागल यांना ताब्यात घेऊन कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. शेवटी म्हणजे याचा आठवड्यात माजी आमदार नारायण पाटील गटाचे कार्यकर्ते आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी एकत्र आले होते. त्यानंतर आमदार शिंदे गटाच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणून आमदार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल (शुक्रवारी) एकत्र येऊन निवेदन दिले होते.
या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल, असे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना सांगून कोकणे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला होता. गणेशोत्सव जवळ आला असल्याने शांततेत गणेशोत्सव साजरा करून त्यात सामाजिक कार्यक्रम घेण्याचे आवाहन कोकणे यांनी केले होते. डीजेला बंदी असून कोणीही डीजे वापरू नये. मिरवणुकीत सरकारच्या आदेशाप्रमाणे नियमांची अमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या काही कामांवर नाराजी व्यक्त केली जात होती. तर काही कामात त्यांचे कौतुकही केले जात होते.
भोसले प्रकरणात कोकणे यांनी स्वतः न्यायालयात बाजू मांडली होती. बारामती येथील न्यायालयातही कोकणे यांनी भोसले प्रकरणात युक्तीवाद केला होता. अनेकदा पोलिस संशयित आरोपीला तपासासाठी पोलिस कोठडी मागतात मात्र संशयित आरोपींच्या वकिलांची खेळी लक्षात घेऊन भोसले यांना करमाळा पोलिसांकडे आणण्यासाठी न्यायालयीन कोठडी मागितली होती. न्यायालयाने तेव्हा न्यायालयीन कोठडी दिली आणि लगेच करमाळा पोलिसांना त्यांचा ताबा मागितला होता. सिने स्टाईलने कोकणे यांनी भोसले यांना करमाळ्यात आणले होते. करमाळ्यात अनेकदा कोकणे यांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कारवाई करण्यासाठी स्वतः गाडी चालवत पेट्रोलिंग केले. दारू पिऊन गाडी चावणाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केली होती. अशा अनेक प्रकारातून कोकणे यांनी त्यांचा कार्यकाल करमाळ्यात गाजवला आहे.