करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार) ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी अजितदादा पवार यांचे समर्थक अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा पराभव केला आहे. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानी राहिले आहेत. पाटील हे 15 हजार 740 मतांनी विजयी झाले आहेत.
करमाळा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांचा पाठींबा काढत माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने पाटील यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली होती. पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली ती शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली. महायुतीचे उमेदवार बागल हे दहाव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानी होते. या फेरीनंतर शिंदे हे दुसऱ्या स्थानी आले मात्र ते पाटील यांना गाठू शकले नाहीत. करमाळा व माढा या दोन्ही तालुक्यात ते पिछाडीवर राहिले.
शिंदे यांच्यावर माढा तालुक्यातील ३६ गावात रोष असल्याचे नेरिटिव्ह पाटील गटाने तयार केले. ते घालवण्यात शिंदे अपयशी ठरले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवार गटात प्रवेश केला. तेव्हा करमाळ्याचे नारायण पाटील यांनीही पाटील गटात प्रवेश केला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
संजयमामा शिंदे यांनी ३ हजार ४९० कोटीच्या निधीचा विकास केला यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले मात्र पाटील यांनी त्यावर केलेल्या चालीत शिंदे अयशस्वी झाले. जगताप यांनी पाटील यांना पाठींबा देताच शिंदेंवर टीकास्त्र सुरु केले होते. त्यावर शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे, विलास पाटील यांनी वेळोवेळी उत्तर दिले मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही हे निकालावरून दिसले आहे.