करमाळा (सोलापूर) : तालुक्यात काल (बुधवारी) दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये करंजे येथील एकाचा (सर्पदंशाने) तर दुसरा घोटी ते वरकुटे रस्त्यावर (दुधाचा टँकर उलटून) मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृतदेह एकाचवेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात होते. एकाचे शवविच्छेदन सुरु असताना दुसरा मृतदेह रुग्णवाहिकेत होता. या दोन्ही मृत्यूमुळे रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. करमाळा पोलिस व रुग्णालयातील कर्मचारी यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सुभाष व्यंकट सरडे (वय ५०) असे नाव आहे तर अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सुनील गेना शेलार (वय ५५, रा. वेणेगाव, ता. माढा) असे नाव आहे. अपघात मृत्यू झालेली व्यक्ती दुधाच्या टँकरची चालक आहे. दूध जमा करण्यासाठी तो जात होता. मात्र त्याचा टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जाऊन धडकला. त्यात टँकर उलटला आणि त्याला गंभीर जखम होऊन मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. मृत्यू झालेल्या शेलार या चालकांना ५ मुली व एक मुलगा आहे. मुली विवाहित आहेत, असे सांगितले जात आहे.

या अपघाताचे कारण समजले नाही मात्र तेथील उपस्थितांच्या म्हणण्यानुसार टँकरला झोला बसल्याने चाकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने अपघात झालेला असू शकतो, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात एवढा भीषण होता की टँकरची झाडाला धडक बसल्याबरोबर उलटला. तेथील उपस्थितांच्या म्हणण्यानुसार हा टँकर वेगात नसेल. मात्र झोला बसल्यामुळेच हा अपघात झालेला असू शकतो. यात मृत्यू झालेल्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सर्पदंशाने मृत्यू झालेले करंजे येथील सुभाष व्यंकट सरडे हे मकाई सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी होते. बुधवारी ते शेतात गवत काढत असताना त्यांच्या हाताला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला. यावेळी त्यांची पत्नी शेतात त्यांच्याबरोबर गवत काढत होती. सर्पदंश होताच त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर त्यांना करमाळा येथे रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न फेल गेले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपयोग झाला नाही. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे श्वविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुले, दोन भाऊ, भावजई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोन्ही मृतदेह एकाचवेळी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात होते. त्यामुळे दुःख व्यक्त केले जात होते.