करमाळा (अशोक मुरूमकर) : ढोल- ताशाचा कडकडाट… त्यात वासुदेवाचा पोशाख परिधान केलेल्या दोघांचा ठेका… अन हिरव्यागार मोरपंखी झाडांमधून जात असलेल्या रस्त्यावर लक्षवेधून घेणाऱ्या रांगोळीवर उभा राहून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करणारे विद्यार्थी पाहून आयुष्याचा टर्निंग पॉईन्ट म्हणून पहिल्या जाणाऱ्या बारावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य निर्माण झाले. परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांचा तणाव वाढल्याचे दिसते पण करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात परीक्षार्थीला पेपर देताना उत्साह निर्माण व्हावे, असे वातावरण तयार करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीचा आज (मंगळवार) पहिला पेपर होता. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींवर पुष्पवृष्टी केली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोल- तशाच कडकडाट होता. त्यात वासुदेवाचा पोशाख परिधान केलेले विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता. केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी स्वतः गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून विद्यार्थ्यांची चेकिंग केली जात होती. सर्व वर्गात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यावर दोन ठिकणावरून नियंत्रण ठेवले जात आहे. वर्गात पंखे लावण्यात आले असून पिण्यासाठी शुद्ध पाणी ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी म्हणून आनंदी वातावरण करण्यात आले होते. यासाठी साधणार ६५ अधिकारी व कर्मचारी कार्यकर्त आहेत. करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय येथे १२ वीची परीक्षा सुरु आहे. प्राध्यापक व कर्मचारी ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.



