तृतीयपंथियांनी बचतीची सवय ठेवावी; उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांचे आवाहन

सोलापूर : तृतीयपंथियांना समाजात वावरण्यासाठी शासन सर्व सोयी-सुविधा देत आहे. त्यांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना आणल्या आहेत. यामुळे तृतीयपंथियांनी आजारापणात, वृद्धापकाळात उपयोगी पडण्यासाठी पैशांच्या बचतीची सवय लावून घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी आज केले.

रंगभवन येथे जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा एडस नियंत्रण कार्यालय, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी आणि निरामय आरोग्यधाम संस्थेच्या वतीने आयोजित तृतीयपंथीय आणि वंचित महिलांच्या स्नेहमेळावा, विविध दाखले वाटप कार्यक्रमात श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी, तहसीलदार अमरदीप वाकडे, निरामयच्या प्रकल्प संचालिका सीमा किणीकर, ॲड. लक्ष्मण मारडकर, एडस सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी नागेश गंजी, विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे, दोस्ताना संघटनेचे आयुब सय्यद, सौंदर्या उपस्थित होते.

वाघमारे यांनी सांगितले की, नागरिकांनी तृतीयपंथियाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तेही एक व्यक्ती आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथियांनी उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, ओळखपत्र, रेशनकार्ड याबाबत पाठपुरावा करावा. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सतत पाठपुरावा केल्याने केवळ स्वयंघोषणापत्र दिल्यास तृतीयपंथीय असल्याचे युनिक ओळखपत्र मिळत आहे. जिल्ह्यात 215 तृतीयपंथियांना मतदान कार्ड देण्यात आले आहे. उर्वरित तृतीयपंथियांनाही शिबीराद्वारे दाखले दिले जातील. कोणत्याही बाबतीत त्यांना वंचित ठेवले जाणार नाही, मात्र त्यांनी पुढे येऊन माहिती घ्यावी. त्यांच्या घराच्या भूखंडासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

तृतीयपंथियांनाही अधिकार व हक्क : न्यायाधीश जोशी

न्यायाधीश श्री. जोशी यांनी सांगितले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून वंचित, आर्थिक बाबतीत गरीब, महिला, बालक यांना मोफत कायदेशीर सेवा दिली जाते. घटनेतील तरतुदीनुसार लिंग, जाती भेद करता येत नाही. तृतीयपंथीयही भारताचे नागरिक आहेत, त्यांना घटनेनुसार अधिकार, सोयी-सुविधाबाबतचे हक्क दिले आहेत. त्यांच्यामधील विषमता दूर व्हायला हवी. तृतीयपंथीय, वंचित महिला यांना कायदेशीर अडचणी आल्यास विधी सेवा प्राधिकरण त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. या सेवेपासून कोणीही वंचित राहणार नाही.

वाकडे म्हणाले, जिल्ह्यात तृतीयपंथीयांना ओळख देण्याचे काम होत आहे. आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात 215 तृतीयपंथीय अधिकृत मतदार झाले आहेत. वंचित राहिलेल्यांनी मतदान, ओळखपत्र काढून घ्यावेत, प्रशासन आपणास मदत करेल. मतदार नोंदणी करून मतदान कार्ड आधारशी जोडणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

ॲड. मारडकर यांनी सांगितले की, तृतीयपंथीय आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये फरक नाही. घटनेने हक्क दिले आहेत, कायद्याने कायमस्वरूपी नोकरीसाठी आरक्षण दिले, निवडणूक लढण्यास, न्यायाधीश होण्यास, नोकरी करण्यास अधिकार दिले आहेत. आपण वेगळे आहोत, हा न्यूनगंड काढून टाकावा.

प्रास्ताविकातून श्रीमती किणीकर यांनी तृतीयपंथीय, वंचित महिलांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. समाजाने तृतीयपंथीयाकडे व्यक्ती म्हणून पाहावे, त्यांना चांगली वागणूक द्यावी, असे आवाहन केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात तृतीयपंथीय आणि वंचित महिलांना 10 मतदान कार्ड, 6 केशरी रेशनकार्ड (यामध्ये अन्नसुरक्षा योजनेचा लाभ), पाच संजय गांधी निराधार योजना आणि पाच तृतीयपंथीय ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सतीश राठोड यांनी केले तर आभार शिवाजी शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *