महाराष्ट्रातील उर्दू घरे

Urdu Houses in Maharashtra

भारतात जन्मलेल्या आणि त्यामुळे अस्सल भारतीय असलेल्या उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण वाढावी यासाठी राज्यामध्ये ४ उर्दू घरांची निर्मिती करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या या उपक्रमाविषयी माहिती देणारा हा विशेष लेख…

Advertisement
Advertisement

बात करनेका हसीं तौर-तरीक़ा सीखा, हमने उर्दूके बहानेसे सलीक़ा सीखा…
उर्दू भाषेचे वर्णन करताना कवी मनीश शुक्ला यांनी हा शेर रचला आहे. उर्दू ही एक अतिशय गोड भाषा मानली जाते. भारतीय साहित्याच्या विकासात उर्दू भाषेने बहुमोल असे योगदान दिले आहे. मुळात उर्दू भाषेचा जन्म भारतातच झालेला असल्याने ही एक अस्सल भारतीय भाषा आहे. महाराष्ट्रामध्येही उर्दू भाषेचा मोठा प्रभाव असून विशेषतः बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये उर्दू भाषेने आपल्या रसाळ वाणीने गोडवा आणला आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये उर्दू भाषेच्या रसिकांची संख्या फार मोठी आहे. अशा या रसाळ उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाण-घेवाण वाढावी यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येतात. उर्दू भाषेच्या विकासासाठी एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही उर्दू भाषिकबहुल शहरांमध्ये उर्दू घर उभारण्यात येत आहेत.

सद्य:स्थितीत नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. नांदेड आणि मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून सोलापूर उर्दू घराचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूर उर्दू घराचे काम सुरु आहे. नांदेड उर्दू घराचे उद्घाटनही करण्यात आले आहे. या उर्दू घरामध्ये कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, क्लासरुम, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १ कक्ष, पाहुण्यासांठी २ कक्ष तसेच १ ग्रीन रुम बांधण्यात आलेली आहे.

या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी धोरण आखण्यात आले असून सविस्तर नियमावली जारी करण्यात आलेली आहे. उर्दू घराच्या इमारती या राज्य शासनाच्या मालकीच्या राहतील, उर्दू घराचे नियंत्रण व व्यवस्थापन संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी नाही अशा दर्जाचे अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहे.

उर्दू घरांचा वापर हा प्रामुख्याने व प्राधान्याने उर्दू भाषेचा प्रसार व विकास, उर्दू साहित्याचा व कलात्मतेचा प्रसार व विकास, नाट्य, शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात यावा. इतर वेळी संबंधित जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने उर्दूशिवाय अन्य भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यासाठी उर्दू घराचा वापर करता येईल, असेही धोरण निश्चित करण्यात आले आहे. उर्दू भाषा, मराठी भाषा आणि इतर भाषांमध्ये देवाण-घेवाण वाढावी, हा यामागे उद्देश आहे. उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे.

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रम इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय/ ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविण्यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविण्याचे प्रयत्न केले जातील. त्या अनुदानातून काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जातील.

कोणत्याही परिस्थितीत उर्दू घराचा वापर राजकीय, खाजगी किंवा धार्मिक उद्दीष्टांकरिता करण्यात येणार नाही, असे निदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाकरिता उर्दू घर प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यासाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तसेच उर्दू भाषा व उर्दू साहित्याशी संबंधित कार्यक्रमांकरिता सवलतीचे दर आकारण्यात येतील, असे धोरण निश्चित करून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

भाषा ही नेहमीच समाजाला जोडण्याचे काम करते. उर्दू भाषेने आपल्यातील गोडवा, इतरांप्रती व्यक्त होणारा आदरभाव अशा अनेक गुणांनी इतर भाषिक लोकांच्या मनातही स्थान निर्माण केले आहे. उर्दू भाषा, त्यातील गजला, शेरोशायरी लोकांना नेहमीच आवडतात, सर्वच भाषकांची याला नेहमीच दाद मिळते. त्यामुळे उर्दू भाषेने देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यालाच अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत उर्दू घरांची निर्मिती करून या भाषेच्या विकासाला तसेच मराठी-उर्दूची देवाणघेवाण वाढविण्याला चालना देण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उभी राहत असलेली ही ४ उर्दू घरे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक विकासात बहुमोल योगदान देतील, असे निश्चितपणे वाटते.

शेवटी अशोक साहिल यांच्या उर्दू भाषेविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या या शायरीने या लेखाचा समारोप करतो. ते म्हणतात –
उर्दूके चंद लफ़्ज़ हैं जबसे ज़बान पर, तहज़ीब मेहरबाँ है मेरे ख़ानदान पर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *