करमाळा (करण वीर) : तालुक्यातील सौंदे येथे यावर्षी झेंडू शेतीचे प्रमाण वाढले आहे. दसरा व दिवाळीच्या निमित्त झेंडूला मोठी मागणी असते. त्यामुळे झेंडू तोडीचे नियोजन शेतकऱ्यांकडून सुरु आहे. झेंडू उत्पादक शेतकरी लक्ष्मण आवटे म्हणाले, ‘झेंडू या पिकाची 4- 5 वर्षांपासून लागवड करत आहे. दर चांगला मिळाला तर उत्पादन चांगले मिळते. यावर्षी आम्ही अर्धा एकरात 2 हजार 500 रोपांची लागवड केली आहे. दसरा व दिवाळीच्या निमित्ताने पुणे (मुळशी) येथे त्याची फुले विकण्यास घेऊन जातो. सध्या 50 ते 80 रुपये किलो असा झेंडूचे दर आहे. यावर्षी झेंडूला हवामानाने चांगली साथ दिली आहे.’

लक्ष्मण आवटे यांच्यासह या गावात झेंडूचे उत्पादन शुभम आवटे, ऋषिकेश आवटे, निखिल आवटे, नागनाथ जाधव आदींनी घेतले आहे. सौंदेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात झेंडूचे पीक दिसून येत आहे. करमाळा तालुक्यातून सौंदेसह वरकटने, सरपडोह, फिसरे, शेलगाव, साडे या गावातही झेंडू मोठ्या प्रमाणात आहे.

