पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू

सोलापूर : राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात आणि या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. 2023 मध्ये नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर, कोकण या विभागांसाठी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे.

Advertisement
Advertisement

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पुर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त करून तीन वर्षे झालेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांत उपलब्ध आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर

https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForm s/Form-18.pdf या दुव्यावर उपलब्ध आहे.

 अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात.  हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांत उपलब्ध आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_ PDFs/Form19.pdf या दुव्यावर उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवाशी कल्यणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्धी केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. तर 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *