करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील पोथरेनाका परिसरात गटार तुंबल्याने जामखेड रोडवर येते असलेल्या पाण्याकडे नगरपालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता सावंत गटाचे नेते सुनील सावंत आक्रमक झाले आहेत. तत्काळ तुंबलेली गटार काढली नाही तर घाण पाणी नगरपालिकेत टाकण्याचा इशारा त्यांनी मंगळवारी (ता. २) ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिला आहे.

पोथरे नाका परिसरातील जामखेड रोडवरील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यामधील व्यापारी सध्या रस्त्यावर येणाऱ्या घाण पाण्यामुळे हैराण झाले आहेत. बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गटार तुंबली आहे. त्यामुळे पाणी वर येत असून या भागात दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी गाळेधारकानी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पोथरे नाका परिसरात नगर व जामखेड रोडला गाळे आहेत. गाळेधारक नगरपालिकेला वर्षाचा कर भारतात मात्र सुविधा मिळत नसल्याची तक्रार त्यांची आहे. गटार तुंबून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. जामखेड रोडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे.

सावंत म्हणाले, मंगळवारी मोठ्याप्रमाणात रस्त्यावरून वाहत होते. हे पाणी घाण ओढ्यापर्यंत येत आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या दुकानांसमोर घाण पाणी येत असल्याने ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी पाणी साचत असून दुर्गंधीही पसरलेली आहे. सध्या पावसाळा सुरु असून पाऊस झाल्यानंतर घाण ओढा येथे पाणी साचत आहे. त्यात गटारीचे पाणी येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा हेच घाण पाणी भरून नगरपालिकेत टाकले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
