करमाळा तालुकयातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी सुरु व्हावा म्हणून प्रयत्न केला जात आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना पाटील व बागल गटाच्या संचालकांचे हे प्रयत्न सुरु आहेत. मंत्री सावंत यांच्या सूचनेनुसार कट्टर राजकीय विरोधक पाटील व बागल गट आदिनाथसाठी एकत्र आले आहेत. हे सांगितले जात असले तरी बागल गटाने यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते जसे संभ्रमात आहेत तसे इतर गटांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. आदिनाथच्या उभारणीमध्ये मोहिते पाटील गटाचेही मोठे योगदान आहे. संस्था वाचली पाहिजे म्हणून ते प्रयत्नशील आहेत. यातूनच त्यांनी आदिनाथसाठी सहकार्याची भूमिका घेतली.
‘जो कारखाना व्यवस्थित चालवेल त्याला आम्ही सहकार्य करणार’, असे भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि कारखाना सहकारी तत्वावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु आता तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक उघडपणे कोठेही दिसत नसून तेही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत का असा प्रश्न आहे.

आदिनाथ कारखाना हे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर आहे. हा कारखाना बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तीन वर्ष हा कारखाना बंद राहिला आता हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. फेब्रुवारी- मार्चमध्ये आदिनाथ कारखाना सहकारी तत्वावर सुरु रहावा म्हणून आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यात मोहिते पाटील समर्थक तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, ऍड. शशिकांत नरुटे, शहाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी आता प्रयत्न होत असताना पहिल्या बैठकीला उपस्थित असलेले मोहिते पाटील समर्थक मात्र अपवाद सोडला तर दिसले नाहीत. बागल व पाटील हे एकत्र आले असले तरी त्यांनी जाहीरपणे त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्यात, असे ते खासगीत म्हणत आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी आमचे सहकार्यच रहाणार मात्र बागल व पाटील गटाची नेमकी भूमिका समजणेही आवश्यक आहे.

माजी आमदार नारायण पाटील यांनी आदिनाथ सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम शिंदे यांची मदत मिळत असल्याचे सांगितले आहे. मात्र मोहिते पाटील समर्थक अजूनतरी (पहिल्या बैठकीला असलेले) उघडपणे दिसलेले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.