करमाळा (सोलापूर) माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा तालुक्याचा नुकताच दोन दिवसाचा दौरा केला होता. तेव्हा तालुक्यातील टेंभुर्णी ते नगर या महामार्गाबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर आपण बैठक घेणार असल्याचे आश्वासन खासदार निंबाळकर यांनी दिले होते. मात्र पुढे यांचे काय झाले असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.
टेंभुर्णी ते नगर हा महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. करमाळा तालुक्यात जातेगावपर्यंत याची हद्द आहे. मात्र या महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्ता खराब असल्याने अपघातही होत आहेत. याकडे सरकारने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. त्यातूनच नागरिकांनी खासदार निंबाळकर यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. तेव्हा त्यांनी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

सध्या राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो अशी अशी अशा करमाळकरांना आहे. करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली होती. तेव्हा भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जगताप गटाचे शंभूराजे जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे आदी यावेळी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातून जाणारा नगर- टेंभुर्णी या मार्गावर जड वाहतूक मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. या रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु आहे. आमदार संजयामामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील आदींकडून पाठपुरावा केला आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा असल्याने सर्व पक्ष व सर्व गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

आता खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून तरी या रस्त्याचे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न केला जात असून त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काम मार्गी लावावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील नागरिक करत आहेत. य मार्गावरून तमिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्याला जोडणारा हा मार्ग आहे.