करमाळा (सोलापूर) : कोरोनानंतर यंदा दोन वर्षांनी करमाळ्यात मोठ्या उत्साहात श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. तब्बल आठ तास या मिरवणुका चालल्या. करमाळ्यातील १२५ वर्षाची परंपरा असलेला मानाचा पहिला श्री देवीचामाळ येथील राजेराव रंभा तरुण मंडळाचा गणपती मिरवणूक निघाल्यानंतर मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. पहिल्या गणपती पाठोपाठ दुसरा मानाचा किल्ला वेस येथील लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाचा गणपती निघाला त्यानंतर मानाचा मानाचा तिसरा (भुईकोट किल्ला, किल्ला विभाग) गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुका निघाली. रात्री ११.४० वाजता फुलसौंदर चौक येथे शेवटची नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाचा शेवटचा गणपती विसर्जन मिरवणूक गेली. त्यानंतर जय महाराष्ट्र चौकात ११.५६ वाजता पोलिसांनी डीजे बंद करायला सांगितले. त्यानंतर सुभाष चौक येथे मध्यरात्री १२.०५ वाजता (००.०५) सर्व बाजुंनी पोलिसांनी एकत्र येऊन सर्व ठिकाणचे डीजे बंद केले त्यानंतर वाद्य बंद करून श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुका पुढे मार्गस्थ झाल्या.

करमाळा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे स्वतः हजर राहून लक्ष ठेऊन होते. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे हेही यावेळी उपस्थित होते. १०० पोलिस, ७ पोलिस अधिकारी व ३४ होमगार्ड मिरवणूक मार्गावर बंदोबस्तासाठी उपस्थित होते. मिरवणुका वेळेत व शांतते व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मानाच्या तीन गणपती पाठोपाठ फंड गल्ली येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळ, राशीन पेठ तरुण मंडळ, गजराज तरुण मंडळ, सरकार मित्र मंडळ, सहकार मित्र मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, नेताजी तरुण मंडळ, हिंदवी तरुण मंडळ, रंभापूरा येथील गणेशोत्सव मंडळ असे एकापाठोपाठ गणपतीच्या मिरवणुका निघाल्या होत्या.

फुलसौंदर चौक येथे करमाळा उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे स्वागत केले. जामा मशीद जमात ट्रस्ट करमाळा यांच्या वतीने जामा मशिदीवरून गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करण्यात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथेही स्वागत करण्यात आले. सिंधी समाज बांधवांकडून जामा मशीद समोर गणेश भक्तांना प्रसाद (लंगर) वाटप करण्यात आला. करमाळा नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेजवळ गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीवेळी विजेचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून महावितरणचे करमाळा उपविभागीय उपकार्यकारी अभियंता सुशांत जाधव यांनी प्रत्येक मंडळाबरोबर व महत्वाच्या ठिकाणी एक कर्मचारी दिला होता. नगरपालिकेनेही कृत्रिम तलाव येथे कर्मचारी तैनात केले होते. अग्निशमनची एक गाडी तैनात करून कर्मचाऱ्यांना अलर्ट केले होते. मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधिकारी व होमगार्ड मिरवणूक मार्गावर तैनात होते. याशिवाय मंडळातील स्वयंसेवकही कार्यकर्त्यांना शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना देत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व भाजपचे तालुकाध्य गणेश चिवटे यांनीही मिरवणुकीत सहभागी होऊन आंनद घेतला.

मिरवणुकीतील वैशिष्ट्य…
१) फंड गल्ली येथील मंडळाच्या लेझीम पथकाने गणेश भक्तांचे लक्ष वेधले. प्राचार्य मिलिंद फंड व माजी नगरसेवक अतुल फंड हे स्वतः या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक निघाल्यापासून सर्व कार्यकर्ते लेझीम खेळत होते. जय महाराष्ट्र चौक येथे मंडळाच्या लेझीमच्या डावाने सर्वांचे लक्ष वेधले.
२) गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये आकर्षक रथ तयार करण्यात आले होते. राशीन पेठ तरुण मंडळाचा भक्ती रथ होता. तर नवजवान सुतार तालीमने केदारनाथ मंदिर साकारले होते. श्रीदेवीचामाळ येथील गणपती हत्तीवर विराजमान झाले होते. तर किल्ला विभाग येथील श्री गणेश नंदीवर साकारले होते. जय महाराष्ट्र तरुण मंडळाने करमाळा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणे प्रतिकृती साकारली होती. याशिवाय इतर मंडळांनाही आकर्षक रोषणाई केली होती. मिरवणूक रथाची उंची जास्त असल्याने अनेक ठिकाणी वर तारा व वायरल लागत होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही अडचण लक्षात घेऊन तयारी केली होती.
३) मिरवणुका पहाण्यासाठी राशीन पेठ, वेताळ पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जय महाराष्ट्र चौक परिसरात महिलांनी गर्दी केली होती.
४) श्री गणेशाची मिरवणूक निघाल्यापासूनच करमाळा शहरात अतिशय मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. याशिवाय फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
५) श्री गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान थोरांचा सहभाग होता.
संपादन : अशोक मुरूमकर