करमाळा (सोलापूर) येथील श्री दत्त मंदीर ते न्यायालय या रस्त्याच्या मालकीवरून सध्या नाट्य रंगले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याच्या मालकीवरून आता हात वर केले आहेत. तर करमाळा नगरपालिकेने या रस्त्याची दुरुस्ती करून दिल्यास मालकी स्वीकारली जाईल, असे सांगितले आहे. मालकी नसताना केवळ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही त्यावर खर्च केला असल्याचे आता अधिकारी सांगू लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आता यावरून आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

करमाळा येथील श्री दत्त मंदीर ते न्यायालय हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, न्यायालय, जिल्हा परिषदेचे विश्रामगृह, पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडे येण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. करमाळा तालुक्यातील प्रमुख असलेल्या बागल गटाच्या नेत्यांचे निवासस्थान या रस्त्यावर आहे. याबरोबर तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ज्याची ओळख आहे ते विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांचेही निवासस्थान याच रस्त्यावर आहे. असा प्रमुख असलेला हा रस्ता सध्या दुर्लक्षित आहे. (की जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे)

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची निर्मिती झाली तेव्हा हा रस्ता तयार करण्यात आला होता, असे सांगितले जात आहे. कालांतराने करमाळा शहराचा विस्तार झाला. सध्या हा रस्ता शहरात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची मालकी नगरपालिकेने घ्यावी, अशी जिल्हा परिषदेची मागणी आहे. तसा ठरावही पंचायत समितीच्या सदस्यांच्या बैठकीत झाला होता. त्यानंतर नगरपालिकेला ते पत्रही देण्यात आले. त्यावर नगरपालिकेने रस्त्याची दुरुस्ती करून दिल्यास रस्ता स्वीकारला जाईल, असे पत्रच पुन्हा जिल्हा परिषदेला देण्यात आले. प्रशासनाच्या टोलवाटोलवीत सध्या नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी यांच्यासह भीमदल व इतर संघटनांनी या रस्त्यासाठी आवाज उठवला होता. जेव्हा आवाज उठवला तेव्हा- तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांकडून निधी मागण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले. मात्र त्या प्रस्तवाना अक्षरशः केराची टोपली दाखवण्यात आली असल्याची स्थिती आहे. अपवाद वगळता या रस्त्यासाठी तुटपुंजा निधी देण्यात आला. पण त्यातून रस्त्यासाठी कायमचा मार्ग निघालेला नाही. ‘अनिरुद्ध कांबळे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र त्यांच्याकडूनही या रस्त्याबाबत नागिरकांची निराशा झाली आहे,’ असा आरोप एखादा मनसेने जाहीरपणे केला होता. त्याचाही पाहिजे तसा परिणाम झालेला नाही.

आमदार संजयमामा शिंदे यांनाही या रस्त्याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे. मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही. या रस्त्यावरून रहदारी जास्त आहे. ऊसाची वाहतूक याच रस्त्यावरून होते. एक- दीड महिन्यात साखर कारखाने सुरु होतील. तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पुणे व मुंबईला जाणाऱ्या एसटी बस देखील याच रस्त्याने जातात. करंजकर रुग्णालय येथून गायकवाड चौककडे पूर्वी वाहने येत होती. मात्र येथून जड वाहतूक बंद करण्यात आली असल्याने सर्व वाहतूक न्यायालयाकडून येते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे फक्त ‘कागदी घोडे नाचवण्यापेक्षा’ आता कृतीची गरज आहे. त्यातील अडथळे दूर करून काम कसे पूर्ण होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे बस्स!
संपादन : अशोक मुरूमकर