करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात हातपंपावर सौर यंत्रणा बसवण्याची कामे सुरु आहेत. मात्र स्थानिक नागरिकांना विचारात न घेता ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. स्थानिक प्रशासन मात्र यात आमचा संबंध नसल्याचे सांगून हात झटकत आहेत. याचा त्रास नागरिकांना होणार आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बिटरगाव श्री येथे हातपंपावर सौर यंत्रणा बसवण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम अतिशय निकृष्ठ आहे. त्यामुळे यांचा नागरिकांना फायदा होणार नाही. उन्हाळ्यात येथील एकाच हातपंपाला पाणी राहते. त्यामुळे त्यावर सौर यंत्रणा बसवण्यासाठी मागणी होती. त्यानंतर पाण्याची गरज ओळखून त्याला निधी उपलब्ध झाला. मात्र आता टक्केवारीतून हे काम निकृष्ठ केले जात आहे.
या यंत्रणेतून जी जलवाहिनी टाकली जात आहे त्याचे पाईप वरच आहेत. ते लगेच फुटणार आहेत. अर्धाफुटसुद्धा खाली गाडलेले नाहीत. रस्त्यावरुन जलवाहिनी नेली आहे. फक्त बिल मिळावे म्हणून हे काम केले असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये नागरिकांचे हीत नसून येथील पाणी दुसरीकडे नेले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांवर अन्याय होणार आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.