करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे शेतीच्या कारणावरून एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पती- पत्नीसह मुलगा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आदिनाथ गोरख केकाण, शुभम आदिनाथ केकाण व रतन आदिनाथ केकाण (सर्व रा. रावगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पद्मिनी रामकृष्ण बुधवंत (वय ६०, रा. रावगाव, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमची रावगाव येथे ८ एकर शेती आहे. आमच्या शेजारी गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी केकाण यांची शेती आहे. त्यांच्यात शेतीवरून वाद सुरु आहे. १२ तारखेला गवत काढत असताना गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी तेथे आले व वाटेच्या कडेला गवत का काढता. येथे येईचे काय कारण असे म्हणत मारहाण केली. पुन्हा येथे आली तर जिवे मारण्याची धमकी दिली आहे. १२ तारखेला हा गुन्हा दाखल झाला आहे.


