सोलापूर : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आधुनिक भारताचे जनक राजाराममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरणावर गुरूवारी (ता. 22) शालेय मुलींची जनजागृती रॅली होणार आहे; अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे.

रॅलीमध्ये हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, एम. ए. पानगल विद्यालय, सिध्देश्वर कन्या प्रशाला, सेवासदन कन्या प्रशाला, निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यात शालेय मुलांच्या विविध पथकासह ग्रंथदिडीचा समावेश राहणार आहे. 22 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहातून जनजागृती रॅलीला सुरूवात होणार असून होम मैदान मार्गे ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, डफरीन चौक, पार्क चौक, फडकुले सभागृह, होम मैदान ते हरिभाई देवकरण प्रशाला ते मुळे सभागृहात रॅलीची सांगता होणार आहे.

रॅलीचा शुभारंभ माहिती व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षा म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. श्रीमती कविता निळ मुरूमकर, हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक हनुमंत मोतीबणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
