जयराज खूप लहान होता तेव्हा त्याला सोडून आई गेली. पुढे आजी शांताबाई व आजोबा भीमाआबा यांनी त्याचा सांभाळ केला. बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती सासरी गेली. वडिलांचं आयुष्य कष्टातच गेलं. ज्या वयात जयराजने खेळायचं, शिकायचं होतं त्याचवेळी कुटुंबाचीही जबाबदारी त्याच्यावर होती. पोटाचं खळग भरण्यासाठी तो मिळेल ते काम करत होता. कधी हमाली केली कधी ड्रॉयव्हरकी केली मात्र त्याने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि आपल्या परस्थितीचे कारणही त्याने कधीच कोणापुढे केले नाही. काम करत असतानाच त्याला काळाने गाठलं. त्यात नेमके त्याचे काय चूकले हे अनुत्तरीतच राहिलं!
बिटरगाव (श्री) येथील २० वर्षांच्या जयराज येवलेचा काल कर्नाटकात अपघातामध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनं संपुर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात वडील, आजी, आजोबा, चुलती असा परिवार आहे. जयराज चिमुकला असताना आईचे निधन झाले होते. पुढे काही वर्षात चुलता नितीनचे ही निधन झाले. परिस्थितीनुसार जयराजने मिळेल ते काम करत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
फक्त शिकून भागणार नाही तर गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्यला कामही करावा लागणार याची जाणीव त्याला होती. त्यामुळे सुट्टीत तो मिळेल ते काम करायचा. त्याने करमाळ्यात हमालीही केली. पण कोणापुढेही मदतीचा हात मागितला नाही. स्वतः कष्ट करून त्याने दोन वर्षांपूर्वी मोटारसायकल घेतली होती. त्याचा आनंद त्याचे आजोबा भीमराव आणि आजी शांताबाई व वडील पिंटूला होताच. ‘माझ्या जयड्याने सर गाडी घेतली’ असे अनेकदा आबा सांगायचे. शांतामावशी भेटल्यानंतर जयड्याबद्दल सांगायची. पण याच जयड्याला काळाने गाठले.
भीमा येवले आणि आमचे साधणार ३० वर्षांपासूनचे सबंध आहेत. भीमा आबा गावात असताना मुरलीधर दळवी यांच्या घरात रहायला होते तर आम्ही जुन्या पाणी टाकीजवळ जोग्यांच्या घरात राहत होतो. तेव्हापासून येवले कुटुंब आणि आमचे सबंध आहेत. पुढे ते पांडुरंग वस्ती येथे स्वतःच्या घरात गेले. भीमाआबा आणि शांतामावशी दोघेही कष्टाळू अजूनही त्यांचे कष्ट करणं सुरूच आहे. त्यांची एक मुलगी, सून, धाकटा मुलगा गेला. या दुःखातून सावरणं सोपं नव्हतं. आता कुठं थोडा कुटुंबाचा गाडा व्यवस्थित होऊ लागला होता. त्यात पुन्हा जीवापाड जपलेल्या जयड्याचा कर्नाटकात अपघात झाला.
जयराज हा अतिशय शांत आणि कष्टाळू होता. अपघाताची माहिती समजताच काल बिटरगाव श्री येथील एक गाडी घटनास्थळाकडे गेली होती. त्यानंतर आज पहाटे मृतदेह घरी आणण्यात आला. सकाळी ८ वाजताच्या सुमारास बिटरगाव श्री येथील पांडुरंग वस्तीवर अंतसंस्कार झाले. अंत्यसंस्कारानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या अनेक आठवणी सांगितल्या. असा मित्र पुन्हा होणे नाही, असे म्हणत ते भावुक झाले. करमाळ्यातही त्याचे अनेक मित्र होते. गेल्यावर्षी तुळजापूरला जाताना एक अपघात होताना तो वाचला होता. त्याच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याने तो सुखरूप होता. कालच्या अपघाताचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र काळानेच त्याला गाठलं असं म्हणण्याची वेळ आली आहे. तो सोशल मीडियावर अतिशय ऍक्टिव्ह होता. कर्नाटकातून परतत असताना पोस्ट केलेला व्हिडीओ त्याचा शेवटचा ठरला आहे.
-अशोक मुरूमकर