करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणीची मोहीम सुरु आहे यातूनच २२ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान करमाळा विधानसभा मतदार संघात १०४९ नवमतदारानी नोंदणी केली आहे यामध्ये ३६५ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत तर ६८४ मतदार २० पेक्षा जास्त वयाचे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जास्तीत जास्त मतदान व्हावे व सर्वांनी मतनोंदणी करावी यासाठी निवडणूक आयोगाकडून उपक्रम राबविले जात आहेत. करमाळा विधानसभा मतदार संघात सहायक निवडणूक अधिकारी चारुशीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबिवले जात आहेत. तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार दादासाहेब गायकवाड, गटविकास अधिकारी मनोज राऊत हे मतदान नोंदणीसाठी आवाहन करत आहेत.
देशमुख यांनी करमाळा येथील अनेक गावात व महाविद्यालयात जाऊन तरुणांना मतदान नोंदणीचे आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर होईपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मतदान नोंदणी अधिकारी म्हणून काही ग्रामसेवक, शिक्षक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.