करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी नियमात शिथिलता आल्यानंतर आजपासून (गुरुवार) करमाळा तालुक्यात अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 463 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ३५८ ऑफलाईन व १०५ ऑनलाईन अर्ज आले आहेत, अशी माहिती करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीडहजार म्हणजे वर्षाला १८ हजार राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटीची तरतूद केली आहे. नाव नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. घर बसल्या हे अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात येत आहेत. याशिवाय ऑफलाईन ही अर्ज स्विकारले जात आहेत, असे गटविकास राऊत यांनी सांगितले आहे.