करमाळा (सोलापूर) : रीटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत. त्यातूनच त्यांनी जलसंपदा विभागाकडून कृष्णा खोरे महामंडळाला ४७ लाख वितरण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात बागल यांनी म्हटले आहे की, दहीगाव उपसा सिंचन योजना युती सरकारच्या काळात स्व. दिगंबरराव बागल मामा यांनी मंजूर करुन आणली आणि ८० टक्के काम पूर्ण केले. त्यामुळे ही योजना पूर्व भागात कार्यान्वित आहे. करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील गावांना कुकडीचे पाणी पूर्ण दाबाने मिळत नव्हते. त्यामुळे हे पाणी उजनी जलाशयात नदीद्वारे सोडून रीटेवाडी उपसा सिंचन योजना करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात करमाळा तालुक्यातील ४० गावातील सरपंच यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे बैठक घेतली होती. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
केम वडशिवणे उपसा सिंचन योजना तसेच पांढरेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या शी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच या दोन्ही योजनांच्या सर्वेक्षणाचे आदेश देऊन निधीची तरतूद करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.