करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ओढे वाहिले आहेत. तलावातही पाणी साचले असून काही विहिरी व बोअरला पाणी आले आहे. याचा परिणाम शेतीवर झाला असून गावागावांमध्ये सुरु झालेल्या टँकरवर देखील झाला आहे. तालुक्यात सुरु असलेल्या टँकरपैकी २६ गावातील टँकर बंद झाले आहेत.
करमाळा तालुक्यात यावर्षी नागरिकांना तीव्रपणे टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. तालुक्यातील ४६ गावांमध्ये टँकरने पाणी सुरु होता. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला असल्याने २६ गावातील टँकर बंद केले आहेत. तालुक्यात वर्षभर पडणाऱ्या पावसाच्या सरासरींपैकी साधणार 60 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.
तालुक्यात पावसाळ्यात ४०० मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. पावसाळ्यात (जून, जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर) हा पाऊस पडत असतो. गेल्यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हते. उजनी धरण १०० टक्के भरले नव्हते. सीना नदीलाही पाणी नव्हते. मांगी तलाव भरलेला नव्हता. याचा परिणाम शेतीसह सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर झाला होता. उन्ह्याळात ४६ गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. पाऊस वेळेवर पडल्याने टँकर बंद करावे लागले आहेत.