करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मकाई सहकार साखर कारखाना, विहाळ येथील भैरवनाथ साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना (विठ्ठल रिफाईयनरी) यांनी शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे अद्याप पैसे दिलेले नाहीत. हे घामाचे पैसे मिळावेत म्हणून शेतकरी कारखानदारांकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. काही संघटना पैशासाठी आंदोलने करण्याचा फक्त इशारा देत आहेत. हे आंदोलने होऊ नये म्हणून त्यांना फक्त आश्वासन दिले जात. मात्र ते आश्वासन पाळले जात नाही, असे चित्र तालुक्यात आहे. तीन कारखान्याकडून ९३ कोटी ३३ लाख रुपये शेतकऱ्यांना पैसे देणे आहे.
करमाळा तालुक्यात मकाई सहकारी साखर कारखाना, विहाळ येथील भैरवनाथ साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना यांच्याकडे शेतकऱ्यांचे पैसे येणे आहेत. ऊस गाळप होऊन सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे आलेले नाहीत. मुलांच्या शाळा, लग्न व शेतीच्या कामासाठी शेतकऱ्याला पैशाची गरज असताना कारखानदार मात्र शेतकऱ्यांची पिळवून करत आहेत. याचा फटका पुढील गाळप हंगामावर परिणाम होणार असून अशा कारखानदारांना शेतकरी ऊस देणार नसल्याची चर्चा आहे.
शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत म्हणून राजाभाऊ कदम यांनी रस्ता रोको आंदोलन केले. चेअरमनच्या घरावर मोर्चाचे नियोजन केले. मात्र आंदोलनावेळी फक्त कागदोपत्री तारीख देण्यात आली. वास्तवात मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. संघटना प्रयत्न करत असल्या तरी त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मकाई कारखान्याने तर कृषी महोत्सवावेळी एक तारीख दिली होती. त्यानंतर आंदोलनावेळी वेगवेगळ्या तारखा दिल्या. आता तर निवडणूक सुरु आहे. अजूनही तारीखच सांगितली जात आहे. मात्र शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न आहे.
मीडिया रिपोर्टनुसार विहाळ येथील साखर कारखान्याकडे १२ कोटी १२ लाख, मकाई साखर कारखान्याकडे १८ कोटी ५७ लाख व कमलाईकडे ६२ कोटी ६३ लाख रुपये शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दिलेले नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.