करमाळा (अशोक मुरूमकर) : दोन दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यात दोन पोस्ट कार्यालयांना मंजुरी मिळाली असल्याचे समोर आले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे यासाठी मोठे प्रयत्न आहेत. याची सकारात्मक चर्चा सुरु असतानाच करमाळा पोस्ट कार्यालयात ‘मुदत ठेवी’साठी ठिय्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले. दोन दिवसांपूर्वी अतुल खूपसे यांच्या नेतृत्वाखाली एका ग्राहकाच्या पैशासाठी ठिय्या मांडण्यात आला होता. ग्राहकांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत आणि ते कायदेशीररित्या त्वरित दिलेही पाहिजेत त्यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या ठिय्याबाबत सध्या वेगळीच चर्चा सुरु आहे. त्याचे वास्तव नेमके काय आहे?
करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील एका ग्राहकाने पोस्टाकडे गुंतवणूक केली. संबंधित गुंतवणुकीची पावतीही संबंधित ग्राहकाला दिली होती. सर्व कायदेशीरबाबी याच्या पूर्ण झाल्या होत्या, आणि कोणतीही बेकायदाबाब संबंधितांना सांगितलेली नव्हती. या ठेवीवर मिळणारे व्याज देखील त्यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधितांनी मागितलेली ठेव कायदेशीर नसून त्याबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चाही केली होती, असे पोस्टातील संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
संबंधित पोस्ट कर्मचाऱ्याचा गावात दूध व्यवसाय आहे. पोस्टाचे काम पाहून ते व्यवसाय करतात. या स्पर्धेतून किंवा स्थानिक राजकारणातून त्यांना टार्गेट करण्याचा तर यातून प्रयत्न होत नाही ना? याचा विचार करण्याची गरज आहे. पोस्ट खात्यावर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. तो कायम टिकणे आवश्यक आहे. केवळ राजकारणासाठी हा प्रकार केला जात असल्याची चर्चा आहे. यापूर्वी या गावातील एक शाळाही अशाच चुकीच्या प्रकरणात बंद पडली होती, अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. पोस्टातील प्रकरणात बातमीदारांच्या नावावर पैसे मागितले, मात्र ते कर्मचाऱ्यांनी दिले नाहीत म्हणून संबंधित आंदोलन कर्त्याला राग आला. अशीही चर्चा आहे.
खासदार मोहिते पाटील यांच्यामुळे करमाळा तालुक्यात दोन पोस्ट होणे हे सकारात्मक आहे. पण मुदत ठेवींबाबत होत असलेले आंदोलन याला नेमके काय म्हणायचे. विशेष म्हणजे या प्रकरणात खासदार मोहिते पाटील यांनीच मध्यस्ती केली असल्याची चर्चा आहे. मग खूपसे यांनी हे आंदोलन करण्याचा नेमका काय उद्देश होता? अशी चर्चा आहे.