आचारसंहिता लागण्यापूर्वी करमाळा बसस्थानक नूतनीकरणाचे भूमिपूजन करा

करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानकाचे नूतनीकरण व व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी 15 कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून आचारसंहितेपूर्वी याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन झाले पाहिजे, अशा गतिमान पद्धतीने कारवाई करा, असे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन महामंडळाचे राज्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. महाजन यांना दिले.

मुंबई येथे करमाळा बसस्थानक नूतनीकरण व शॉपिंग सेंटर नूतनीकरणाचे नकाशा व इस्टिमेटचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम गतिमान करून आचारसंहितेपूर्वी याचे भूमिपूजन झाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. यावेळी तात्काळ भ्रमणध्वनीवरून नामदार प्रताप सरनाईक यांनी व्यवस्थापकीय संचालक महाजन यांच्याशी संपर्क साधून याची टेंडर प्रक्रियेचे काम तात्काळ सुरु करा, निधी कमी पडत असेल तर बीओटी तत्त्वावर काम करण्याचे नियोजन करा. 16 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय कारवाई पूर्ण करा, असे आदेश दिले.

करमाळा बसस्थानकामध्ये सीएनजी गॅस पंप मंजूर असून भावी काळात गॅसवर एसटी बसेस येणार असून या सीएनजी गॅस पंपाची काम युद्ध पातळीवर करा, अशा सूचना दिल्या. करमाळा शहराच्या मध्यवस्ती भागात एसटी महामंडळाची सात एकर जागा असून या जागेत भव्य शॉपिंग सेंटर होऊन बेरोजगार तरुणांना व्यावसायिक गाळे उपलब्ध करून द्यावे, अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी होती. याचा शिवसेना जिल्हाप्रमुख गेली वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. जेऊर बसस्थानकासाठी महेश चिवटे यांच्या प्रयत्नातून तीन कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. करमाळा बस स्थानकात सिमेंट रस्त्यासाठी अडीच कोटी मंजूर झाले आहेत. हा दोन्ही निधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर झाला असून आता ही कामे वेगाने सुरू आहेत. अजून नवीन १० एसटी बसेस करमाळा डेपोला देण्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *