करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात सोमवारी (ता. १५) अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस कोर्टी व केत्तूर महसुली मंडळात झाला असून करमाळा व अर्जुननगरमध्ये सर्वाधिक कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे जनजीवनावर काहीकाळ परिणाम झाला. तहसीलदार शिल्पा ठाकोडे यांनी घटनास्थळाला भेटी देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.

कोर्टी येथे घर, दुकाने, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व पोस्ट कार्यालयामध्ये पाणी शिरले. यात साधणार १२ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत कार्यालय ओढ्याच्या लगत असल्यामुळे त्याचे जास्त नुकसान झाले आहे. नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरु असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

करमाळा तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस कोसळला. सकाळी साधणार साडेनऊ वाजेपर्यंत हा पाऊस सुरु होता. कोर्टी येथील पुलावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद पडली होती. गावामध्येही ओढ्याचे पाणी शिरले होते. पाणी ओसरल्यानंतर येथील वाहतूक सुरु झाली आहे. काही घरांमध्येही पाणी शिरल्याचे नागरिक सांगत आहेत. तहसीलदार ठोकडे यांनी या गावाला तत्काळ भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. पोन्धवडी येथेही ओढ्याचे पाणी पुलावर आल्याने वाहतूक बंद झाली. तालुक्यात सरासरी ६१. ३० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. हिसरे येथील पुलावरून दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक सुरु झालेली नव्हती, असे शिवसेनेचे शंभूराजे फरतडे यांनी ‘काय सांगता’शी बोलताना सांगितले.

करमाळा तालुक्यातील करमाळा मंडळात ३०.८०, अर्जुननगर मंडळात ३०.८०, केम मंडळात ७२.५०, जेऊर मंडळात ६७.८०, सालसे मंडळात ६७.३०, कोर्टी मंडळात ७६.८०, उमरड मंडळात ६७.८० तर केत्तूर मंडळात ७६.८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी सांगितले आहे.