करमाळा (सोलापूर) : सरकारी शाळांची खासगी शाळांबरोबर स्पर्धा सुरु असतानाच ग्रामीण भागात मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मात्र सरकारच त्यांना सुविधा देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथील शाळेवरून दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत येथे शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त करून आज (बुधवारी) या विद्यार्थ्यांनी करमाळा पंचायत समितीसमोरच शाळा भरवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र यातून तरी त्यांना शिक्षक मिळणार का हा प्रश्न आहे.
वांगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला पुरेशे शिक्षक नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पंचायत समिती परिसरात घेराव घातला. ‘आम्हाला शिक्षक द्या, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, शाळा सोडून आम्ही घरी काय भांडी घासायची का?’ असा संतप्त प्रश्न त्यांनी केला आहे.
अशी आहे शाळेची स्थिती…
वांगी नंबर १ येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आहे. येथे सध्या सात शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आणखी तीन शिक्षकांच्या आवश्यकता आहे. येथे पहिली ते पाचवी 154 व सहावी ते सातवी 120 विद्यार्थी आहेत. येथे पाचवी ते सातवीच्या सेमी व मराठी माध्यमाचे दोन वेगवेगळे वर्ग आहेत. येथे सध्या एकाच वर्गात अध्यापन सुरु आहे. एकाच वर्गातील अध्यापनमुळे विद्यार्थी अध्यापनावर त्याचा परिणाम होत आहे. एवढे विद्यार्थी बसतील अशा क्षमतेचे वर्गही नाहीत. त्यामुळे आणखी तीन शिक्षक मिळावेत या मागणीसाठी स्वतः विद्यार्थी करमाळ्यात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर येऊन बसले.
यांची होती उपस्थिती…
प्रा. रामदास झोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, विष्णुपंत वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे, माजी उपाध्यक्ष गणेश रकटे, दगडु लिगडे, लक्ष्मण ढावरे आदि उपस्थित होते.