करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदार संघामध्ये सरासरीपेक्षा जास्त झाल्यामुळे खरीप पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई देण्याबाबत आमदार नारायण पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे.
करमाळा मतदारसंघामध्ये दोन दिवसामध्ये सरासरीच्या ७८.९ टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतातील कांदा, उडीद, मुग, तूर, मका, बाजरी, सोयाबिन, केळी व भाजीपालाचे नुकसान झाले आहे. करमाळा मतदारसंघात केम ७२.५, जेऊर ६७.८, सालसे ६७.३, कोर्टी ७६.८, उमरड ६७.८, केत्तूर ७६.८, कुर्डूवाडी ६५.३, रोपळे ८५.३, महिसगाव ६६.८ टक्के मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या मंडलातील गावामधील शेतकर्यांची काढणीस आलेली पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. कृषी विभागाने योग्य ती कार्यवाही सुरु करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

वडाचीवाडी येथील शांताबाई वाघ या महिलेच्या अंगावर १३ तारखेला वीज कोसळली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याच गावातील दुसरी महिलेच्या शरीरावर वीज पडल्याने गंभीर भाजलेली आहे. या महिलेच्या नातेवाईकास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून आर्थिक सहाय करण्यात यावे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.