करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु झाले आहेत. ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहेत. ‘कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही’ याची दक्षता घेण्याची सूचना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिल्या आहेत.
करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे खडकी, आळजापूर, तरटगाव, बिटरगाव श्री, पोथरे, निलज, बाळेवाडी, पोटेगाव, बोरगाव आदी गावांमध्ये शेतीचे व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेकतऱ्यांचे नदी काटावरील विद्युतपंप, पाईप, स्टार्टर पेटी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असल्याचे या पंचनाम्यावेळी दिसले. तूर, उडीद, ऊस, मका, कांदा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी पात्रापासून ३०० तर ५०० फुटापर्यंत पुराचे पाणी आले होते. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदी काटावरील शेतातील माती देखील वाहून गेली आहे. याचे पंचनामे सध्या सुरु आहेत.
ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन पहाणी करून पंचनामे केले आहेत. पंचनामा करण्यासाठी बांधावर जावे लागत असल्याने वेळ लागत आहे शिवाय पाऊस आणि काही ठिकाणी पाणी असल्यामुळे पंचनामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. अशा स्थितीतही अधिकारी कोणताही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घेत आहेत. अतिशय पारदर्शक व सूक्ष्मपणे हे पंचनामे सुरु आहेत. बिटरगाव श्री येथे ग्राम महसूल अधिकारी निलेश मुरकुटे, कृषी सहाय्यक दादा नवले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी युवराज देवकर म्हणाले, ‘बिटरगाव श्री येथे सीना नदी काटावरील नुकसान झालेल्या पिकाचे व शेतीचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याकडून सुरु आहेत. अतिशय पारदर्शीपणे हे पंचानामे सुरु आहेत. या पंचनाम्याची दखल घेऊन सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी. अनेक शेतकऱ्यांची पिके अजूनही पाण्यात आहेत. खूप मोठे असे हे नुकसान आहे.’