करमाळा (सोलापूर) : ‘सर बिटरगावमधून प्रार्थना करते तुम्हाला शेतकऱ्यांची तुम्ही दखल घेतलीच पाहिजे, निर्णय घेणारे तुम्हीच आहात. पाच सहा हजाराच्या मदतीने कसे नुकसान भरून निघेल? द्यायची तर तत्काळ भरीव मदत द्या’ असे व्याकुळपणे म्हणत शेतकरी महिला केशर मुरूमकर यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे मांडली आहे.
करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथे अतिवृष्टी व पुरसदृश्य परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची आज (बुधवारी) मंत्री शिरसाठ यांनी शेतात जाऊन पहाणी केली. खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही सीना नदी काठी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सीना नदीच्या पुरामुळे तरटगाव, खडकी येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे. नदी काठच्या शेतातील मातीही मोठ्या प्रमाणात वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. याची पहाणी मंत्री शिरसाठ यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडली. तेव्हा सर्व फळबागांचेही पंचनामे करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांनी दिले. शेतात जाता येत नसल्याने त्यांनी ड्रोनद्वारे पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
बिटरगाव श्री सह करमाळा तालुक्यातील कोर्टी, सरपडोहमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. मंत्री शिरसाट म्हणाले, ‘सिना नदीच्या महापुरामुळे नदीकाठावरील शेती पूर्णतः उध्वस्त झाली असून काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी भरलेले असून पंचनामे करण्यासाठी सर्कल व तलाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पंचनामे ड्रोनच्या माध्यमातून करण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील जास्त नुकसान लक्षात घेता येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत सरकारकडून मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, पत्रकार अशोक मुरूमकर, प्रवीण घोडके, सामाजिक कार्यकर्ते बबन मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, बबन बोराडे, युवराज देवकर, दौलत वाघमोडे, युवासेनेचे कानगुडे, चंद्रकांत राखुंडे, बाळासाहेब माने, शिवाजी मुरूमकर, वैभव मुरूमकर, शिवाजी बोराडे, गोकुळ बाबर, बापूराव मुरुमकर यांच्यासह महिला शेतकरी वैजंता मुरूमकर, उर्मिला शिंदे, संगीता माने, मालन खराडे आदी उपस्थित होते.