करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या करमाळा तालुक्यातील नागरिकांना आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाळवा (सांगली) येथील राजारामबापू पाटील उद्योग समूहच्या वतीने पशुखाद्य, पाणी बॉटल व बिस्कीट फुडे अशी १२ टनाची मदत देण्यात आली.
करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या निलज, बोरगाव, बाळेवाडी, तरटगाव, बिटरगाव (श्री), खडकी, खांबेवाडी येथील शेतकऱ्यांना ‘एक मदतीचा हात’ म्हणून ही मदत करण्यात आली.यामध्ये जनावरांसाठी सुग्रास, मुरघास व नागरिकांना बिस्कीट पुडे व शुद्ध पाणी बाटल्या दिल्या आहेत. गुरुवारी पाटील यांनी करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली आणि अवघ्या 16 तासांमध्ये त्यांनी करमाळ्याकडे मदतीची वहाने पाठवली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक डॉ. अमोल घाडगे, संचालक रविकिरण फुके, अमरजित साळुंखे, सचिन नलवडे, पोलिस पाटील भूषण अभिमन्यू, ऍड. प्रशांत बागल, गहिनीनाथ दळवी, प्रवीण घोडके, बापूराव मुरूमकर, गणेश लोहार, नितीन मुरूमकर आदी उपस्थित होते.