करमाळा (सोलापूर) : ‘अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’नुसार दाखल गुन्हातील संशयित आरोपीला करमाळा पोलिस ठाण्यात अटक न करता नोटीस देऊन सोडवले असल्याचा आरोप करत करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने शनिवारी (ता. 18) दुपारी साडेबारा वाजता तहसील कार्यालयावर ‘भव्य ॲट्रॉसिटी ॲक्ट मोर्चा’ काढण्यात येणार असून हालगीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. गायकवाड चौक येथून हे आंदोलन सुरू होणार आहे, अशी माहिती नागेश कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘करमाळा पोलिस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपीला तपास अधिकारी तथा करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमळा पोलिस ठाण्यात नोटीस देऊन सोडून दिली आहे याची चौकशी करण्यात यावी.
करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. उपविभागीय अधिकारी अंजन कृष्णा यांनी संशयित आरोपीला हजर राहण्याची नोटीस बजावलेली असून त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडून देण्यात आले की गंभीरबाब आहे. संशयित आरोपी हे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये फिरत आहेत. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती वेळी ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
2023 मध्ये संशयित आरोपीने पीडितेचा विनयभंग केला होता. याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षांकडेही केली होती. या गुन्ह्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संशयित आरोपीला बळ न देता कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. या मागणीसाठी शनिवारी साडेबारा वाजता तहसील कार्यालय येथे आंदोलन केले जाणार आहे, असे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.